पुरंदर रिपोर्टर Live
पुणे:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांचा यंदाचा वर्धापन दिन १० जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या भव्य मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, तसेच पक्षाचे सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
या वर्धापन दिनाचे आयोजन येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारेल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणारा मेळावा पक्षाची ताकद दाखवण्याची संधी ठरणार आहे. “या मेळाव्यातून पक्ष अधिक भक्कम होईल, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल आणि पुणे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल,” असा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
राजकीयदृष्ट्या पुण्यातील ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या मेळाव्याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0 Comments